Durga Matechi Nav Shakti Shali Rupe
दुर्गा मातेची नऊ शक्तीशाली रूपे
नऊ देवींची वेगवेगळी जरी रूपे असली तरी दुर्गा देवीचीच ही रूपे आहेत. आदिशक्तिच्या आराधनेचे पर्व म्हणुन नवरात्र उत्सव साजरा केला जातो. शक्ती विना विश्व हे शवासमान आहे असे म्हटले जाते. शक्तिमुळेच तर संपुर्ण ब्रह्मांडाची उत्पत्ती झाली आहे. शक्ति आराधना करण्यासाठी नऊ दिवसांचा काळ अर्थात नवरात्र अत्यंत मह्त्वपुर्ण आहे. नवरात्रात ब्रह्मांडातील सर्व शक्ति जागृत होतात. याच शक्तिने दैत्यांचा संहार केला आहे. याच नऊ देवींची नऊ रूपे आणि त्यांची माहिती.
शैलपुत्री :
दुर्गा देवीचं प्रथम रूप शैलपुत्री आहे. पर्वतराजा हिमालय यांची कन्या असल्याने दुर्गामातेला “शैलपुत्री” असे म्हटले जाते.शैलपुत्री देवीच्या डाव्या हातात त्रिशुल व उजव्या हातात कमळाचे फुल आहे. शैलपुत्री देवी आपल्या पूर्व जन्मात दक्षराजाची कन्या होती.नवरात्री पुजनात ह्या प्रथम रूपाचे पुजन केले जाते.
ब्रह्मचारिणी :
दुर्गा देवीचं दुसरे रूप ब्रह्मचारिणी आहे. ब्रह्म शब्दाचा अर्थ तपस्या असा होतो. तपाचे आचरण करणारी म्हणजेच ब्रह्मचारिणी. ब्रह्मचारिणी रुपात देवीच्या डाव्या हातात जपाची माळ व उजव्या हातात कमंडलु आहे.
चंद्रघंटा :
दुर्गा देवीचं हे तिसर स्वरूप शांतिदायक आणि कल्याणकारी आहे.देवीच्या मस्तकावर घंटेच्या आकाराचा अर्धचंद्र आहे. म्हणूनच या देवीला चंद्रघंटा असं म्हंटल जाते.पूर्ण शरीर सुवर्ण रंगात आहे. तिला दहा हात असुन , हात खड्ग, बाण आदी शस्त्रांनी विभूषित आहेत. या देवीच वाहन आहे सिंह.
कुष्मांडा :
दुर्गा देवीचं चौथ्या रूपाचे नाव ‘कुष्मांडा’ आहे. आपल्या स्मित हास्यामुळे ब्रह्मांड उत्पन्न केल्यामुळे या देवीला कुष्मांडा देवी असे म्हटले जाते. ही देवी अष्टभुजा या नावाने देखील प्रसिद्ध आहे. तिच्या सात हातात क्रमश: कमंडलू, धनुष्य, बाण, कमळाचे फूल, अमृत कलश, चक्र आणि गदा आहे. आठव्या हातात जपमाळा असून तिचे वाहन सिंह आहे.
स्कंदमाता :
दुर्गेचे पाचवे रूप ‘स्कंदमाता’ या नावाने ओळखले जाते. माता पार्वतीचे प्रथम पुत्र कार्तिकेय चे नाव स्कंद आहे, म्हणूनच स्कंद ची माता स्कंदमाता. या रुपात या देवीने आपल्या पुत्राला म्हणजेच स्कंदला स्वत:च्या मांडीवर घेतलेले आहे. देवीला चार भुजा असून डाव्या बाजूच्या एका भुजेने स्कंदला मांडीवर पकडून ठेवलेले आहे तर दुस-या भुजेत कमळाचे फुल आहे. तसेच उजव्या बाजूच्या एका भुजेने वरमुद्रा दाखवली आहे तर दुस-या भुजेत देखील कमळाचे फुल आहे. देवीचे वाहन सिंह आहे.
कात्यायनी :
दुर्गेचे सहावे रुप म्हणजे कात्यायनी. कत नावाच्या ऋषींच्या पु्त्राचे नाव कात्य.कात्य यांच्या पुत्राचे नाव कात्यायनऋषी.कात्यायन ऋषींनी भगवतीची कठोर तपस्या केली. कठीण उपासनेमुळे प्रसन्न होउन, कात्यायन ऋषींच्या ईच्छेप्रमाणे, भगवतीने त्यांच्या घरी जन्म घेतला. त्यामुळे या देवीला कात्यायनी असे म्हणतात. तिला चार भुजा आहेत. देवीचा उजव्या बाजूकडील वरचा हातात अभयमुद्रा आणि खालच्या हातात वरमुद्रा आहे. डावीकडील वरच्या हातात तलवार आणि खालच्या हातात कमळाचे फूल आहे. तिचे वाहन सिंह आहे.
कालरात्रि :
दुर्गामातेचे सातवे रूप ” कालरात्रि ” असे आहे .देवीच्या शरीराचा रंग काळा असल्याने तिचे हे रूप बघायला अतिशय भितीदायक आहे. देवीचे डोक्यावरील केस हे विखुरलेले आहेत.कालरात्रि देवीचे रूप तिचे हे रूप अतिशय भितीदायक जरी असले तरी हि देवी शुभदायीनी आहे, म्हणूनच ह्या देवीला “शुभंकारी” असे देखील संबोधण्यात येते. देवीला चार भुजा असून एका भुजेची वरमुद्रा, दुस-या भुजेची अभयमुद्रा, तिस-या भुजेत लोखंडी कोयता तर चौथ्या भुजेत कट्यार आहे. ह्या देवीचे वाहन गाढव आहे.
महागौरी :
दुर्गामातेचे आठवे रूप महागौरी. महागौरी देवीने स्वत:च्या पूर्व जन्मात भगवान श्री शंकराला पती स्वरूपात प्राप्त करण्यासाठी कठोर तपस्या केली होती, ही कठोर तपस्या करत असतांना देवीचे शरीर निस्तेज होऊन पूर्ण काळे झाले होते. देवीची कठोर तपस्या बघून भगवान श्री शंकराला तिची दया आली व त्यांनी देवीचे शरीर गंगेच्या पवित्र द्रव्याने स्वच्छ केले त्यामुळे देवीचे शरीर गौरवर्णी दिसू लागली. म्हणूनच देवीला ” महागौरी ” असे संबोधण्यात आले. देवीला चार भुजा आहेत. एका भुजेची अभयमुद्रा, दुस-या भुजेत त्रिशूल, तिस-या भुजेत डमरू तर चौथ्या भुजेची वरमुद्रा आहे. देवीचे वाहन बैल आहे.महागौरी देवी कुमारीका अवस्थेत असल्याचे समजते म्हणुन ह्या देवीच्या पुजनाच्या दिवशी कुमारीकांचे पुजन देखील केले जाते.
सिद्धीदात्री :
माता दुर्गाचे नववे रूप सिद्धिदात्री. सिद्धिदात्रीदेवी कमळाच्या फुलात विराजमान असते. ह्या देवीला चार भुजा असून डाव्या भुजेत चक्र आणि गदा, तर उजव्या भुजेत शंख आणि कमळाचे फुल आहे.तिचे वाहन सिंह आहे. सिद्धीदात्री देवी सिद्धिप्रदान करणारी देवी असून पुराणात अणिमा, महिमा, गरिमा, लघिमा, प्राप्ति, प्राकाम्य, ईशित्व आणि वशित्व ह्या आठ सिद्धी सांगण्यात आलेल्या आहेत.