Wonderful Guru Purnima Message Image

Wonderful Guru Purnima Message Image
आई-वडिलांनी जन्म दिला, पण गुरुने शिकवली जगण्याची कला,
ज्ञान, चरित्र आणि संस्कारांची शिकवण आम्हाला मिळाली आहे,
अशा आमच्या गुरुंना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!
गुरुपौर्णिमा
आषाढ महिन्यातील पौर्णिमा ही भारतात गुरुपुर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा म्हणून साजरी होते. या दिवशी व्यासपूजा करण्याची प्रथा आहे. महर्षि व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आणि मूलाधार होते. भारतीय संस्कृतीची मूळ संकल्पना आणि पुढची जोपासना व्यासांनीच केली आहे. व्यासांनी वेदांचे नीटपणे विभाजन आणि संपादन केले. पूर्वी वेद एकच होता, त्याचे चार भाग व्यासांनी केले. व्यासांनी महाभारत लिहिले. महाभारत हा जगातील सर्वश्रेष्ठ व इलौकिक ग्रंथ. महाभारतात धर्मशास्त्र आहे, नीतिशास्त्र आहे, व्यवहारशास्त्र आहे आणि मानसशास्त्रही आहे. महाभारताची रचना करणारे व्यास त्या कथेशी फार जवळून संबंधित होते. देवी सत्यवतीला कौमार्यावस्थेत झालेला पुत्र म्हणजे व्यास. पुढे सत्यवती हस्तिनापूरची राणी झाली. ह्या राणीला दोन पुत्र झाले. पण ते दोघेही निपुत्रिक वारले. राज्याला वारस उरला नाही. राणी सत्यवती मनोमन व्याकुळ झाली आणि त्या तळमळीतून तिला एक वेगळीच कल्पना सुचली. ती कल्पना त्या काळच्या सामाजिक समजुतीला आणि रीतीरिवाजाला धरून होती.
आपला पूर्वीश्रमीचा पुत्र व्यास याने आपला वंश वाढवावा अशा कल्पनेने तिने व्यासांनी नियोगपद्धतीचा अवलंब करून आपल्या सुनांच्या ठिकाणी संतति निर्माण करावी, असा आग्रह धरला. व्यासांना हे मुळीच मान्य नसल्यामुळे त्यांनी नाना प्रकारे आईला ह्या विचारापासून परावृत्त करण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण सत्यवतीच्या अतीव आग्रहापुढे त्यांचे काही चालले नाही. स्वत:च्या मर्जीविरुद्ध त्यांना तिचे म्हणणे मानणे भाग पडले आणि सत्यवतीच्या दोन्ही सुनांना दोन मुलगे झाले. पहिला धृतराष्ट्र आणि दुसरा पंडू. धृतराष्ट्राची संतति कौरव आणि पंडूची संतति पांडव. ह्याच कौरव-पांडवांचे युद्ध हे महाभारताचे मुख्य कथाबीज होते. व्यासांचे कौरव-पांडव ह्या दोघांशीही असे रक्ताचे आणि नात्याचे संबंध होते. युद्ध होऊ नये म्हणून व्यासांनी कौरव-पांडवांची समजूत काढण्याचा खूप प्रयत्न केला, यश आले नाही, युद्ध झाले. ह्या युद्धामुळे व्यासांची मन:स्थिती किती उद्विग्न आणि उद्धस्त झाली असेल त्याची कल्पना करता येते. युद्धात कोणीही हरला, तरी तो व्यासांचाच आप्तस्वकीय असणार होता. रणभूमीवर कोणाचेही रक्त सांडले तरी ते व्यासांचेच रक्त असणार होते. गीतेच्या प्रारंभी जी अर्जुन-विषादाची वेदना प्रगटते, ती प्रत्यक्षात व्यासांचीच वेदना आहे. गीतोपदेश हा जणू व्यासांनी स्वत:च्या मनालाच केलेला उपदेश आहे. व्यासांनी महाभारत लिहिले आणि धर्माने वागून सर्वांचेच कल्याण होते हे सांगत असूनसुद्धा माझे म्हणणे कोणी ऐकत नाही, असे वैफल्यग्रस्त उद्गार त्यांना पुढे काढावे लागले. व्यासांना आपली धर्मिक आणि सांस्कृतिक परंपरा अति उच्च स्थानी सन्मानाने बसविते.
म्हणौनि भारतीं नाहीं तें न्हवे चि लोकीं तिहीं, एणें कारणें म्हणिपे पाहीं व्यासोच्छिष्ट जगत्रय असे ज्ञानोबा म्हणतात. व्यासांनी जगातील सर्व गोष्टींचा आस्वाद घेतला आहे, अनुभव घेतला आहे. प्रात:स्मरणात व्यासांच्या नमनाचा जो श्लोक आहे त्यात आधीच्या तीन, पुढची एक आणि मधले व्यास धरुन एकूण पाच पिढ्यांचा उल्लेख केलेला आहे. व्यासं वसिष्टनप्तारं, शक्ते पौत्रमकल्मषम् पराशरात्मजं वंदे, शुकतातं तपोनिधिम् कोण? तर व्यास वसिष्ठांचा पणतू, शक्तीचा नातू, पराशराचा पुत्र आणि शुकाचा पिता हे होते.
माणसाला अज्ञानाकडून ज्ञानाच्या प्रकाशाकडे हात धरून नेणारा प्रेमळ ज्ञानी म्हणजे गुरु. तो माणसापेक्षा श्रेष्ठच पण भगवंतापेक्षाही श्रेष्ठ आहे. म्हणून त्यास परब्रह्माइतकं श्रेष्ठ मानले जाते. लौकिक जीवनातील गुरूस या दिवशी वंदन करतात. त्याची पूजा करतात व कृतज्ञतेने त्याचे ऋण फेडतात. त्या प्रित्यर्थ त्यास भावोत्कटतेने गुरुदक्षिणा देतात. ज्यांना लौकिक जीवनात गुरुप्राप्ती झालीच नाही, त्यांनी भगवान श्रीकृष्णाला गुरु मानून त्यांची पूजा करावी. कारण गीता ज्ञान देणारे भगवान श्रीकृष्ण हे जगद्गुरुच होते. गुरुपुजनाबरोबर गुरुंनी दिलेल्या ज्ञानावर मनन चिंतन करून ते आचरणात आणण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा संकल्प या दिवशी करणे खूप उचित ठरेल.