Veer Vinayak Damodar Savarkar Savarkar


Veer Vinayak Damodar Savarkar Savarkar
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वाचे एक महान देशभक्त, जहाल क्रांतिकारक, झुंजार स्वातंत्र्यसेनानी, धैर्याचे मेरुमणी, प्रतिभासंपन्न कवी, सिध्दहस्त लेखक, नाटककार, प्रखर बुद्धिवादी, विज्ञानवादी, हिंदुत्ववादी, तत्त्वनिष्ठ राजकारणी, सहस्रावधी श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारे वक्ते, चिंतनशील, कर्ते समाजसुधारक, भाषा शुध्दीचे प्रवर्तक आणि यंत्रयुगाचे समर्थक असे विविध पैलू होते.
‘मी समुद्रात टाकलेली उडी लोक विसरले तरी चालेल, पण माझा सामाजिक विचार त्यांनी विसरू नये’ या त्यांच्या प्रतिपादनातून ते साजसुधारणांना किती महत्त्व देत होते हे समजून येते. ते हिंदू समाजापुरते बोलत आणि लिहीत होते. तरीपण त्यांना विज्ञाननिष्ठ, पोथीमुक्त आणि ऐहिकतेचे भान असलेला भारतीय समाज घडवायचा होता. सर्व पंथांना एकत्र करून आचार विचार भेद न मानता ‘या भूमीला पितृभू आणि पुण्यमू मानणारे ते हिंदू’ अशी माझी बौध्दिक व्याख्या आहे, असे ते म्हणत. त्यांच्या सामाजिक विचारांचा हिंदुत्व हा गाभा होता. त्यांनी आधुनिक विश्वसंस्कृतीस हिंदुत्वाला जोडण्याचा प्रयत्न केला. त्यांनी हिंदू धर्मग्रंथांचा, शास्त्रांचा अनुकूल असा अर्थ लावला नाही. त्यांनी वेदांचे प्रामाण्य मानले नाही. ते मनुस्मृतीला, वेदांना अभ्यासनीय, आदरणीय ग्रंथ मानत. पण ते अनुकरणीय नाहीत हे सुध्दा परखडपणे सांगतात. विज्ञानयुगाची, यंत्रयुगाची कास धरण्याचे आवाहन करतात. आधुनिकीकरण ही एक मानसिक प्रक्रिया असल्यामुळे मानसिक आधुनिकीकरणासाठी सर्वप्रथम धर्मग्रंथाचे दास्य झुगारून दिले पाहिजे, असे त्यांचे मत होते. धर्मग्रंथ हे ईश्वरनिर्मित आहेत, हे त्यांना मान्य नव्हते तर धर्मग्रंथ मानवनिर्मित आहेत, अशी त्यांची धारणा होती. त्यांचे सामाजिक विचार हे इहवादावर आणि भौतिकवादावर आधारित होते. तरीपण ते अध्यात्माचे वैयक्तिक स्तरावर महत्त्व मान्य करीत. विज्ञानाच्या संशोधन ग्रंथांनाच ते धर्मग्रंथ मानतात. बुध्दीची प्रतिष्ठापना केल्यावर जो धर्म समाजात अस्तित्वात राहील त्यालाच ते विज्ञानधर्म मानतात. हिंदुस्थानला धार्मिक अज्ञानाच्या तमोयुगातून आजच्या सुधारलेल्या विज्ञान युगात आणून सोडणे हे आपले पवित्र कर्तव्य आहे, हाच खरा धर्म आहे, असे ते म्हणतात. धर्मनिष्ठा बाजूला केल्याशिवाय विज्ञाननिष्ठा प्रस्थापित होत नाही, विज्ञानधर्माशिवाय माणसाचा विकासच होऊ शकत नाही, असे त्यांचे ठाम मत होते.

ते विज्ञाननिष्ठ आणि बुद्धिनिष्ठ असल्याने प्रत्क्षनिष्ठ आणि प्रयोगसिध्द विज्ञानच आजच्या परिस्थितीत आमच्या राष्ट्राचा वेद झाला पाहिजे, असे त्यांचे ठाम प्रतिपादन होते. पाच हजार वर्षांपूर्वीच्या अज्ञानयुगाकडे पाठ फिरवा आणि विज्ञानुगाचे स्वागत करा, अशी त्यांची भूमिका असल्यामुळे त्यांनी शुध्द इहवाद मांडला. ते गाईला-बैलाला उपयुक्त पशू मानत. त्यांना देव मानणे म्हणजे मनुष्यास पशूहूनही नीच मानण्यासारखे आणि माणुसकीला कमीपणा आणणारे आहे, असे ते म्हणत. गोमतापूजन, सत्यनारायण, वास्तुशांती या गोष्टी त्यांना वेडेपणाच्या वाटत. गाय ही बैलाची माता आहे, मनुष्याची नव्हे अशा भाषेत ते गाईबद्दल धर्मश्रध्देची चिकित्सा करतात.

2 मे 1921 रोजी सावरकरांची रत्नागिरीमध्ये स्थानबध्दता आणि कोणत्याही राजकीय आंदोलनात भाग न घेण्याच्या मुख्य अटींवर सुटका करण्यात आली. अंदामानातील बंदिवासात आणि रत्नागिरीतील 1924 ते 1937 या तेरा वर्षांच्या स्थानबध्दतेच्या कालखंडात त्यांनी सखोल असे समाजचिंतन केले. या काळात त्यांनी सामाजिक आंदोलनावर, समाज प्रबोधनावर आणि विज्ञानाच्या प्रसारावर लक्ष केंद्रित केले. जातिभेदाचे उन्मूलन, अस्पृश्यता निवारण, भाषाशुध्दी, अंधश्रध्दा निर्मलून, लिपी सुधारणा, हिंदूंचे संघटन आणि शुद्धिकरण हे त्यांनी आपले कार्यक्षेत्र निश्चित केले. त्यासाठी व्याख्याने देणे, लेख लिहिणे, विचार विनिमय, चर्चा, प्रश्नोत्तरे शंकांचे समाधान, वैयक्तिक गाठीभेटी याद्वारे सवर्णांचे प्रबोधन आणि दलितांमध्ये जाणीवजागृतीला त्यांनी सुरुवात केली. सनातन्यांचा, धर्ममार्तंडांचा आपल्या कार्याला विरोध होणार, प्रतिकूल ते घडणार हे त्यांनी गृहीत धरलेले होतेच. परंतु सावरकरांच्या चार वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर रत्नागिरीतील बहुतांशी लोकांची मानसिकता समाजसुधारणांना अनुकूल होऊ लागली.

गणेशोत्सवाच्या निमित्ताने त्यांनी अखिल हिंदूंचा मेळावा आयोजित केला होता. तमध्ये अस्पृश्य मुलांनाही बोलाविण्यात आले होते. या मेळाव्याच्या निमित्ताने हरिजनांच्या मंदिर प्रवेशाची चर्चा सुरू झाली. रत्नागिरीतील विठ्ठल मंदिरात अस्पृश्यांना मंदिर प्रवेश या विषयावर सभा आयोजित करण्यात आली होती. सभेस तीन हजारपेक्षाही जास्त जनसमुताय उपस्थित होता. सभेत गडबडगोंधळ होऊ नये म्हणून कलेक्टर स्वतः जातीने हजर होते. या सभेत सावरकरांनी अत्यंत मुद्देसूद आणि प्रभावी असे भाषण केले. सनातन्यांच्या प्रश्नांना चोख उत्तरे दिली, विचारण्यात आलेल्या शंकांचे निरसन केले. उपस्थित जनसमुदायास डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटने हरिजनांना मंदिरात प्रवेश देण्यासाठी अनुमती आहे ना? असा प्रश्न विचारला. जनसमुदायाने त्यास होकार दिला. यावेळी अस्पृश्य मुलांच्या मेळ्यातील शिवू नावाच्या अस्पृश्य मुलाने-

तुम्ही देवाच्या येऊ दिलेती दारी
आभारी जाहले भारी
हे सुतक युगांचे फिटले
विधिलिखित विटाळ ही मिटले
जन्माचे भांडण मिटले
आम्ही शतकांचे दास, आज सहकारी
आभार झाले भारी
असे गीत म्हणत हिंदू धर्माचा जयघोष करीत मंदिरात प्रवेश केला. कोणत्याही प्रकारचा शाब्दिक विरोध, प्रक्षोभ न उसळता शांतता मार्गाने झालेला अस्पृश्यांचा हा पहिलाच मंदिर प्रवेश होता.

एवढ्यावर न थांबता सर्वच हिंदूंना ज्यात प्रवेश मिळेल असे एखादे मंदिर बांधण्याची संकल्पना सावरकरांच्या डोक्यात आली. रत्नागिरीतील दानशूर गृहस्थ भागोजी शेठ कीर यांना मंदिर बांधून देण्याविषयी सावरकरांनी विचारले. त्याप्रमाणे सर्व हिंदूंना प्रवेश आणि पूजा स्वातंत्र्य देणारे एक मंदिर बांधून देण्याचे मान्य केले. या मंदिरात श्री विष्णुलक्ष्मीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. हेच मंदिर पतितपावन मंदिर म्हणून ओळखले जाते. मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यासाठी काशी आणि नाशिकहून शास्त्री आले होते. त्यांनी भागोजी शेठ कीर हे जातीने भंडारी असल्याने त्यांना वेदोक्ताचा अधिकार नसल्याचे सांगताच सावरकरांनी सर्व हिंदूंना मग ते कोणत्याही जातीचे असोत त्यांना वेदोक्ताचा समान अधिकार असल्याचे ठणकावून सांगितले आणि जर तुम्ही मूर्तीची प्रतिष्ठापना केली नाही तर मी हिंदू धर्म की जय हा एकच मंत्र म्हणून पतितपावन मंदिरात मूर्तीची प्रतिष्ठापना करेन असे बजावले. तेव्हा कुठे सनातन्यांचा विरोध मावळला. भागोजी शेठ यांच्या हस्ते वेदोक्त विधीने 22 फेब्रुवारी 1931 रोजी नियोजित वेळेस मूर्तीची स्थापना करण्यात आली.

गणेशोत्सव, हनुमान उत्सव, संक्रांतीला तिळगूळ समारंभ, दसर्‍याला सोने देणे अशा उपक्रमात सवर्णांच्या बरोबरीने पूर्वास्पृश्यांना सहभागी करण्याच्या मोहिमाच त्यांनी उघडल. रोटी बंदी तोडण्यासाठी त्यांनी अस्पृश्यांना आणि सवर्णांचे सहभोजनाचे अनेक कार्यक्रम रत्नागिरीत आयोजित केले. अस्पृश्यांनीसुध्दा पोटजातीतील दुरावा सोडून देऊन भोजनाच्यावेळी सरमिसळ बसले पाहिजे, असा त्यांचा आग्रह असे. त्यांनी अस्पृश्योद्धार या शब्दाऐवजी स्पृश्योद्धार हा शब्द रूढ केला. जातीच्या आधारावरील जनगणनेस त्यांचा विरोध होता. गुण आणि गुणवत्तेला महत्त्व असायला हवे, असे त्यांचे मत होते. महिलांमधील अस्पृश्यता कमी करण्यासाठी उच्चवर्णीय महिला आणि मागासवर्गीय महिलांचे संयुक्त हळदी-कुंकवाचे कार्यक्रम आयोजित केले. अखिल हिंदू उपहारगृह सुरू करून ते स्वतः त्या उपहारगृहात जाऊन बसत. त्या ठिकाणी चहा फराळाचे पदार्थ तयार करण्यास दलित जातीचा मुलगा ठेवला होता. या उपहारगृहात एक अभिप्राय नोंद पुस्तक ठेवले होते. त्यात पहिला अभिप्राय दादासाहेब मावळंकरांचा होता. सावरकरांचे अस्पृश्यता निवारणाचे आणि जातिभेदाच्या उच्चाटनाचे कार्य पाहून महर्षी विठ्ठल राजी शिंदे यांनी कौतुक करून सावरकरांना माझे उरलेले आयुष्य द्यावे, अशी प्रार्थना केली. माझे अपुरे कार्य हाच वीर पूर्ण करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली.

हिंदूंच्या समाजजीवनावर आघात करणार आणि हिंदूंनी आपल्या हातांनी हौसेने पायात घालून घेतलेल्या वेदोक्त बंदी, व्यवसाय बंदी, स्पर्शबंदी, सिंधुबंदी, शुध्दीबंदी, रोटीबंदी आणि बेटीबंदी या सात बेड्या तोडून घेतल्याशिवाय राष्ट्र त्याग केला पाहिजे. परधर्मात गेलेल्या किवा परधर्मीयांना हिंदू धर्मात घेता आले पाहिजे. त्यांना समतने आणि ममतेने वागवावे, अशी त्यांची शिकवण होती. यज्ञाने पाऊस पडतो हे साफ कोटे असून यज्ञात तुपाचा एक थेंबही वाया गावू नका असे ते सांगत. यज्ञाने पेटलेल्या भारतात दुष्काळ कसे पडतात? असा सवाल ते विचारतात. रत्नागिरीत अस्पृश्यतेचा पुतळा जाळण्यासाठी त्यांनी तरुणांना संमती दिली.

त्यांनी डॉ. बाबसाहेब आंबेडकरांच्या महाडच्या चवदार तळ्याच्या तढ्याला जाहीर पाठिंबा दिला होता. डा. आंबेडकरांचे व्यक्तिमत्व, विद्वता, नेतृत्व, संघटनकौशल्य त्यांचे समाजजागृतीचे कार्य आपल्या राष्ट्राचे धन आहे. त्यांनी केलेले कार्य म्हणजे देशभक्तीचे, मानवतवादी, चिरकालीन महत्त्वाचे आहे, असे त्यांनी म्हटले होते. सावरकरांचे हिंदुत्वाबद्दलचे, हिंदू राष्ट्राबद्दलचे विचार हे वादग्रस्त असू शकतील, पण त्यांचे पोथीमुक्तीचे, विज्ञानवादी, सुधारणावादी आणि इहवादी विचार त्यांच्या अनुयायांनाही पेलले नाहीत. पण त्यांचे हे विचार सगळ्यांनीच स्वीकारले, अमलात आणण्याच्या दृष्टीने पावले टाकली तर जातिवादचे, अंधश्रद्धांचे निर्मूलन होऊन जग सर्वांगीण प्रगतीच्या दृष्टीने वाटचाल करू शकेल. अशा या विज्ञानवादी, समाजसुधारक, उत्कट देशभक्तीचे प्रतीक झालेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र आदरांजली.

प्रा. डॉ. श्रीकांत येळेगावकर

More Entries

  • Tribute To Vinayak Damodar Savarkar In Marathi
  • Vinayak Damodar Savarkar Na Punyatithi Nimitt Pranam
  • Swatantrya Veer Savarkar Shraddhanjali
  • Veer Savarkar Punyatithi Nimitt Shraddhanjali
  • Tribute To Veer Savarkar In Marathi
  • Swatantrya Veer Savarkar Na Bhavnik Shraddhanjali
  • Swatantrya Veer Savarkar Na Vinamra Shraddhanjali
  • Swatantrya Veer Savarkar Na Vinamra Abhivadan
  • Veer Savarkar Na Punyatithi Nimitt Shraddhanjali

Leave a comment

(will not be published)

Subscribe

Loading