Akshay Tritiya Chi Mahiti


अक्षय तृतीया ची माहिती

वैशाख महिन्यातील शुद्ध तृतीया म्हणजे अक्षय्य तृतीया. अक्षय्य तृतीया हा महत्त्वाच्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो. या सणाचे दोन ठळक वैशिष्ट्ये आहेत. एक म्हणजे आपल्या पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या दिवशी पितरांचे स्मरण करून त्यांच्या प्रतिमेचे पूजन करतात, आणि दुसरे म्हणजे या दिवशी जप, हवन किंवा दानधर्म करण्याचीही प्रथा आहे.

या दिवशी मातीचे घागरी एवढे मडके आणून, त्यात पाणी भरून त्यात वाळा टाकतात. त्याने या पाण्याला सुगंध येतो. पळसाच्या पानांच्या केलेल्या पत्रावळीवर व द्रोणात खीर आंब्याचे पन्हे किंवा चिंचोणी, पापड, कुरडया इत्यादी वाढतात. सुगंधित पाण्याने भरलेला घट ब्राह्मणाला दान केला जातो. असे केल्याने पितरांचा आत्मा शांत होतो असे मानले जाते. या दिवशी सुरू केलेल्या कोणत्याही शुभ कार्याचे फळ ‘अक्षय्य’ (न संपणारे) असे मिळते, असा समज आहे. अक्षय्य तृतीयेला ब्रह्मा व श्रीविष्णु यांच्या मिश्र लहरी उच्च देवतांच्या लोकांतून, म्हणजे सगुणलोकांतून पृथ्वीवर येतात. त्यामुळे पृथ्वीवरील सात्त्विकता १० टक्क्यांनी वाढते, अशी कल्पना आहे.

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सदोदित सुख व समृद्धी प्राप्‍त करून देणाऱ्या देवतेच्या कृतज्ञतेचा भाव ठेवून केलेल्या उपासनेमुळे आपल्यावर होणाऱ्या त्या देवतेच्या कृपादृष्टीचा कधीही क्षय होत नाही, अशी समजूत आहे. सदोदित कृपादृष्टी ठेवणाऱ्या मृत्तिकेमुळेच आपल्याला धान्यलक्ष्मी, धनलक्ष्मी व वैभवलक्ष्मी यांची प्राप्ती‍ होते. अक्षय्य तृतीया हा दिवस म्हणजे कृतज्ञ भाव ठेवून अशा मृत्तिकेची उपासना करण्याचा दिवस आहे.
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी राजाने किंवा प्रजेच्या पालनपोषणाची जबाबदारी असणाऱ्यांनी सामूहिकरीत्या राजवाड्यात किंवा सामूहिक पूजाविधीच्या ठिकाणी विष्णूसहित वैभवलक्ष्मीच्या प्रतिमेचे कृतज्ञतेचा भाव ठेवून भक्‍तिभावाने पूजन करावे. यामुळे प्रजा सुखी व समृद्ध होते. नुसत्या लक्ष्मीदेवीची कृपा आपल्यावर होत नाही; कारण लक्ष्मीदेवी ही श्रीविष्णूची शक्ती आहे. जेथे विष्णूलाच बोलावणे नाही, तर त्याच्यासोबत किंवा त्याच्यात असणारी त्याची शक्ती कशी पूजास्थळी येऊन कृपा करेल ? म्हणून कोणत्याही रूपातील लक्ष्मी पूजनाच्या वेळी विष्णूला प्रथम आवाहन करावे व नंतर लक्ष्मीलाही आवाहन करावे. त्यामुळे उपासकाला लक्ष्मीतत्त्वाचा जास्तीत जास्त लाभ होतो.
स्त्रिया या दिवशी हळदीकुंकू करून सुवासिनींना कैरीची डाळ, कैरीचे पन्हे, नारळाची करंजी देतात. या दिवाशी बत्तासे, मोगरयाची फुले किंवा गजरे देतात. भिजवलेल्या हरबरयांनी ओटी भरतात. कुमारिकाही हा सण साजरा करतात. या निमित्ताने सर्व स्तरावरील स्त्रियांमध्ये एकोपा व प्रेमभाव वाढतो.

त्रेतायुगाचा प्रारंभदिन अक्षय्यतृतीया हा होता. या दिवशी एका युगाचा अंत होऊन दुसऱ्या युगाला सुरुवात झाली होती. ज्योतिषशास्त्रात कृत, त्रेता, द्वापर आणि कलियुगाचे सर्व वर्ष मिळून होणाऱ्या युगाला महायुग असे म्हणतात. हे चार युग युगांधी (युगचरण) म्हणून मानले जातात. ब्रह्मदेवाच्या दिवसाचा जो प्रारंभ त्याला कल्पादीं तसेच त्रेतायुगाचा (१२,९६,००० सौर वर्षाएवढा त्रेतायुगाचाकाळ) प्रारंभ म्हणजे युगांधी तिथी वैशाख शुद्ध तृतीयेला येत आहे. ज्या दिवशी एका युगाचा अंत होऊन दुसऱ्या युगाला सुरुवात होते, त्या दिवसाला हिंदू धर्मशास्त्रात अनन्य साधारण महत्त्व आहे. या दिवसाने एका कलहकालाचा अंत व दुसऱ्या युगाच्या सत्ययुगाची सुरुवात, अशी संधी साधलेली असल्याने तो संपूर्ण दिवस शुभ मानला जातो, म्हणूनच अक्षय्यतृतीया या दिवसाला साडेतीन मुहूर्तांतील एक मुहूर्त मानले जाते.

More Entries

  • Akshaya Tritiya Marathi Wish Image
  • Akshaya Tritiya Marathi Shubhechcha
  • Akshaya Tritiya Wish In Marathi
  • Akshaya Tritiya Marathi Shubhechha
  • Akshaya Tritiya Manapasun Shubhechchha

Leave a comment

(will not be published)

Subscribe

Loading