Buddh Purnima Chi Mahiti


बुद्ध पौर्णिमा ची माहिती

गौतम बुध्दांचा जन्म या दिवशी झाला. याच दिवशी त्यांना बोधी वृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली आणि या दिवशी त्यांचे महानिर्वाण झाले. जगातील दु:ख नाहीसे करण्यासाठी भगवान गौतम बुध्दांनी निरनिराळे मार्ग अनुसरले. यासाठी स्वतःचे घरदार सोडून ध्यान मार्ग आणि तपश्चर्येचा मार्गही अनुभवला. मात्र, वैशाख शुद्ध पौर्णिमेला त्यांना ज्ञान प्राप्त झाले आणि दु:खाचे मूळ व ते नाहीसे करण्याचा मार्ग सापडला. ही पौर्णिमा बुद्ध पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. आरंभीचा प्रथमा वस्थेतील बौध्द धर्म हा अगदी साधा, समजण्यास सोपा, नैतिक तत्त्वांवर भीस्त ठेवणारा व मानवता, करुणा व समानता यांचा पुरस्कार करणारा असा होता. या काळात बुध्द हा असामान्य गुणवत्ता असलेला, पण मानवदेह धारण करणाराच मानला जात होता. त्यांना बोधी वृक्षाखाली संबोधी ज्ञान प्राप्त झाले म्हणजे त्यांना या जगात कोणती अबाधित सत्ये आहेत व जगाचे रहाटगाडगे कसे चालते, या सबंधीचे ज्ञान प्राप्त झाले. त्यांना प्रथम चार आर्य सत्यांचा साक्षात्कार झाला. जगात खोल दृष्टीने विचार करता व सर्वत्र चालू असलेले भांडण-तंटे, झगडे, हाणामारी हे दृश्य पाहून सर्वत्र दु:ख पसरलेले आहे. या पहिल्या आर्य सत्याची जाणीव झाली.

दु:ख कशामुळे उत्पन्न होते, यासबंधी विचार करता त्यांना आढळून आले की, हे सर्व लोभामुळे, तृष्णेमुळे उत्पन्न होते. एकाच वस्तूबद्दल दोन व्यक्तींच्या मनात तृष्णा उत्पन्न झाली म्हणजे ती वस्तु स्वतःला मिळविण्याकरीता भांडण-तंटे, झगडा, हाणामारी आलीच. तेव्हा तृष्णा हे दु:खाचे मूळ आहे, असे दुसरे आर्य सत्य त्यांना उमजले. ज्या ज्या गोष्टीला एखादे कारण आहे ती ती गोष्ट, कारण नाहीसे केले म्हणजे, विरोध पावते, नष्ट होते. हे अबाधित तत्त्व आहे. म्हणून त्या दु:खाचा निरोधही होऊ शकतो, हे तिसरे आर्य सत्य त्यांना समजले. निरोध होऊ शकतो तर तो प्राप्त करून घेण्याचा मार्ग असलाच पाहिजे, हे चौथे आर्य सत्यही त्यांना कळून आले. यालाच आर्य अष्टांगिक मार्ग म्हणतात. सर्व भारतीय धर्माप्रमाणे बौध्दांचाही कर्मावर व पुनर्जन्मावर विश्वास आहे. तेव्हा हे जन्ममरणाचे रहाटगाडगे कसे चालते, याचे स्पष्टीकरण करणारा प्रतीत्य-समुत्पादही त्यांना समजला. प्रतीत्य-समुत्पाद म्हणजे एखादी गोष्ट उत्पन्न होते ती स्वयंभू नसून काही तरी पूर्वगामी कारण परंपरेवर अवलंबून आहे. तेव्हा जन्ममृत्यु कसे होतात, याचे स्पष्टीकरण करणारी कार्यकारण परंपरा आहे. एका जन्माचा मागील व पुढील जन्मांशी कार्यकारण परंपरेने कसा संबंध पोहोचता, हे प्रतीत्य-समुत्पादात सांगितले आहे. बुद्ध पौर्णिमेला विशेष ठिकाणी जाऊन सामुहिक प्रार्थना करण्याची पद्धत आहे.

More Entries

  • Buddh Purnima Chya Manahpurvak Shubhechha
  • Buddh Purnima Chya Khup Khup Shubhechha
  • Buddha Purnima Marathi Wish Image
  • Buddha Purnima Marathi Shubhechchha
  • Buddha Purnima Wish In Marathi
  • Buddha Purnima Marathi Picture

Leave a comment

(will not be published)

Subscribe

Loading